मनात हजार विचारांचा गुंता, आभाळ मात्र शांत..
१० ऑक्टोबर | जागतिक मानसिक आरोग्य दिन
सचिनच्या ऑफिसमध्ये सकाळी नेहमीप्रमाणे लगबग सुरू होती. कुणी टार्गेट पूर्ण करण्याच्या धावपळीत, कुणी प्रमोशनच्या प्रतीक्षेत, तर कुणी वरिष्ठांच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या प्रयत्नात होतं. याच गर्दीत एक सहकारी शांतपणे आपलं काम करत होता. चेहऱ्यावर हसू होतं, पण मनात मात्र विचारांचं वादळ सुरू होतं.
सचिनला सुद्धा वाटल “माझं टार्गेट पूर्ण होईल का? माझ्या कामाची दखल घेतली जाईल का? माझ्या सहकाऱ्याला प्रमोशन मिळालं, तर? उद्याचं काय?”
गणेशने विचारलं, “काय रे, सगळं ठीक आहे ना?”
सचिन सहज म्हणाला, “हो, सगळं ठीक आहे!”
पण खरंच सगळं ठीक होतं का?
आपण नेहमी फिरताना आपल्या आजूबाजूला असे कितीतरी लोक असतात, जे चेहऱ्यावर हसू ठेवून मनातला ताण लपवत असतात. कामाच्या ठिकाणी वाढती स्पर्धा, सतत बदलणारी उद्दिष्टं, कामाचा दबाव, नोकरीची असुरक्षितता आणि इतरांशी होणारी तुलना यामुळे मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. कधी कधी काम पूर्ण करण्याच्या धावपळीत आपण स्वतःलाच विसरून जातो. आणि याला आपल्या कौटुंबिक जवाबदारीची जोड तर असतेच. अगदी पोराची फी कशी भरायची पासून त्याला किंवा तिला कोणतं करिअर निवडायचं याचा विचार करताना साहेबाला सुट्टी कशी मागू पर्यंतचा प्रवास सगळेच अनुभवतात.
औद्योगिक आणि संस्थात्मक मानसशास्त्रज्ञ तसेच एच आर प्रोफेशनल म्हणून मला वाटतं, कर्मचाऱ्याची कार्यक्षमता समजून घेताना त्याच्या मानसिक स्वास्थ्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
आज सकाळी चालताना मी सहज वर आकाश पाहिलं आणि त्यात अनेक वायरींचा गुंता दिसला , जसा आपल्या मनात नेहमीच असतो आणि चालत चालत एक छोटीशी गोष्ट आठवली.
एका मुलाने आजोबांना विचारलं, “आभाळात ढग येतात आणि जातात, पण आभाळ तिथेच राहतं. असं का?”
आजोबा म्हणाले, “कारण ढग हे आभाळाचं संपूर्ण अस्तित्व नसतात. ते काही काळासाठी येतात आणि निघून जातात. आपल्या मनातले विचारही असेच असतात. प्रत्येक विचार कायमचा नसतो आणि प्रत्येक भीती खरी ठरतेच असं नाही.”
किती साधा, पण महत्त्वाचा संदेश!
आपलं ऑफिसमध्ये एखादं काम बिघडलं म्हणजे आपण अपयशी ठरत नाही. दुसऱ्याला प्रमोशन मिळालं म्हणजे आपली प्रगती थांबत नाही. प्रत्येक वेळी स्वतःला सिद्ध करण्याची गरज नसते. कधी थांबून स्वतःच्या मनाचं ऐकणंही आवश्यक असतं.
पण मग हा गुंता सोडवायचा कसा?
स्वतःसाठी थोडा वेळ काढा. मनात नेमकं काय सुरू आहे, हे समजून घ्या. दुसऱ्यांशी तुलना करण्याऐवजी स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करा. कामाचा ताण वाढत असेल, तर वरिष्ठांशी मोकळेपणाने बोला. विश्वासू व्यक्तीशी संवाद साधा आणि गरज भासल्यास मानसिक आरोग्य तज्ज्ञांची मदत घ्या.
संस्थांनीही कर्मचाऱ्यांकडे केवळ टार्गेट पूर्ण करणारी व्यक्ती म्हणून न पाहता भावना, स्वप्नं आणि जबाबदाऱ्या असलेला माणूस म्हणून पाहायला हवं. सुरक्षित कार्यसंस्कृती, योग्य संवाद, कौतुक आणि काम-आयुष्याचा समतोल यांना महत्त्व द्यायला हवं.
१० ऑक्टोबर हा जागतिक मानसिक आरोग्य दिन. या निमित्ताने स्वतःला एक प्रश्न विचारूया,
आपण आपल्या कामाची जितकी काळजी घेतो, तितकी आपल्या मनाचीही घेतो का?
शेवटी, या जागतिक मानसिक आरोग्य दिनी एवढंच लक्षात ठेवूया…
प्रत्येक वेळी जिंकणं महत्त्वाचं नसतं, कधी स्वतःला सावरणंही महत्त्वाचं असतं. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शोधण्यापेक्षा, कधी मनाला शांतपणे ऐकून घेणंही गरजेचं असतं.
ऑफिसमध्ये एखाद्याच्या कामाचं कौतुक करण्यापूर्वी, कधीतरी त्याची विचारपूसही करूया. “टार्गेट पूर्ण झालं का?” या प्रश्नासोबत “तू ठीक आहेस ना?” हा प्रश्नही विचारूया. कारण प्रत्येक कर्मचारी आपल्या कामातून संस्थेला काहीतरी देत असतो; पण त्या कामाच्या मागे धडधडणारं मनही असतं, हे विसरून चालणार नाही.
आभाळ कितीही शांत दिसलं, तरी मनात वादळ सुरू असू शकतं… म्हणून चेहऱ्यावरचं हसू नव्हे, तर मनातली शांतताही जपूया.
कारण शेवटी, आयुष्याची खरी कमाई किती टार्गेट पूर्ण केली, किती प्रमोशन मिळाली किंवा किती पुढे गेलो, यातच नसते; तर या सगळ्या प्रवासात आपण स्वतःला किती जपलं आणि आपल्या माणसांना किती समजून घेतलं, यात असते.
चला, अशी कार्यसंस्कृती घडवूया, जिथे माणसाला केवळ त्याच्या कामासाठी ओळखलं जाणार नाही, तर त्याच्या भावनांनाही समजून घेतलं जाईल. कारण निरोगी मनातूनच निरोगी कार्यसंस्कृती जन्माला येते.
राहुल विठ्ठलराव भोईटे
औद्योगिक आणि संस्थात्मक मानसशास्त्रज्ञ

खूपच छान वैचारिक लेख🤏
ReplyDeleteधन्यवाद
DeleteWell documented. 👍100% fact. India is far behind in maintaining empoyee well being. So much of stress , many corporate folks suffering from mental fatigue, diabetis , bp and even heart related ainment because of work stress.
ReplyDeleteधन्यवाद
Deleteएकदम मुद्देसूद लिखाण...काळाची गरज आहे rat race मध्ये न अडकता एकमेकांना समजून घेऊन पुढे जायला पाहिजे. एकमेकांची विचारपूस करायला पाहिजे. वेळ गेल्यावर हळहळण्या पेक्षा वेळीच एकमेकांना आधार द्यायला पाहिजे.
ReplyDeleteधन्यवाद
DeleteNise 👌🏻🙏🏻
ReplyDeleteधन्यवाद.. सर आपलं नाव समजेल का ?
Delete