Wednesday, August 19, 2026

प्रारब्ध..

१५ ऑगस्ट २००० ची सकाळ थोडी धावपळीची असावी, फोटोफास्ट मध्ये सकाळी ८.३० ला पोचायचं म्हणून माझी आवराआवर सुरु असताना किचन मधून आईचा आवाज आला.."अरे हळदीचं दूध तरी घेऊन जा " पण मी घाईत होतो म्हणून नको म्हणून तिला न विचारताच बाहेर पडलो..

नेमकी राखी पौर्णिमा आणि १५ ऑगस्ट एकाच दिवशी असल्यामुळे कामाचा खूप लोड होता, दिवसभर काम झालं आणि साधारण ७.३० ला घरी आलो तर कळलं आईला पॅरालीसीस चा अटॅक आला होता , कृष्णा हॉस्पिटलला पोचलो पण कोमा मध्ये होती, तिची झुंज सुरु होतीच पण नियतीने १९ ऑगस्टला तिला आमच्याकडून हिरावून घेतलं. शेवटी बोलणं झालंच नाही..

आज बरोबर २६ वर्ष झाली, अनेक चांगले वाईट प्रसंग झाले पण हा प्रसंग नेहमी आठवणीत आहे.. आज सकाळी ऑफिसला निघताना विचार आला का बर असं झालं असेल, आईशी परत कधी बोलता येईल का आपल्याला? कि नाहीतर मग वर गेल्यावरच भेट... पण तेवढ्यात डहाणूकरचा सिग्नल सुटला आणि मागच्या गाडीच्या हॉर्नने मला भानावर आणलं 

वैयक्तिक कामामुळे आज नेहमीचा रस्ता बदलून लोकमान्यनगरचा रस्ता घेतला, मग आठवले मी १९९९ ला मॉडर्न मध्ये असताना आमच्या मॉडर्न कॉलेजच्या डॉ.गंधे मॅडम इथेच राहतात या गुरु पौर्णिमेला त्यांना फोन केला तेव्हा लोकमान्यनगरच्या पोस्ट ऑफिस जवळ राहते कधीतरी घरी येऊन जा असे आग्रहाने सांगितलं. का कोणास ठाऊक तिथून जाताना हा विचार मनात यावा कि मॅडम भेटतील कदाचित आणि निव्वळ योगायोग मॅडम खरंच भेटल्या..

मी गाडी थांबवली आणि त्या बोलल्या " हेल्मेटमुळे ओळखलं नाही, तू राहुल ना " मी बोललो हो मॅडम , त्या बोलल्या मी ओळखते रे तुला, वेळ आहे का पण तुला कि ऑफिस ची वेळ चुकेल..

नाही म्हणत गप्पा झाल्या, मॅडमने नवीन पुस्तक लिहिलं त्याची माहिती दिली पण का कोणास ठाऊक आईच्या उंचीच्या आणि तिच्याच देहबोलीच्या मॅडमशी बोलताना डोळे कधी पाणावले कळलं नाही, त्यांना सांगितलं आज आईचे २६ वे पुण्यस्मरण आणि तुम्ही भेटला. मॅडम बोलल्या "अरे आमचा मैत्रिणींचा ग्रुप आहे रोज भेटत असतो चहाला कोणी ७५ च्या, तर कोणी ७० च्या पण आज उशीर झाला आणि आपण भेटलो."

काय योगायोग माझ्या आईच आणि मॅडमच वय एकच निघालं आणि अंगावर सरसरून काटा आला. मॅडमला मी बोललो आज आईची आठवण झाली आणि त्या बोलल्या अरे मी आईच आहे तुझी..तुझ्या सारखे विद्यार्थी भेटले कि एनर्जी मिळते.. 

डोळ्यात अश्रूंची गर्दी झाली. मॅडमने हि त्यांचा रस्ता धरला आणि मला मात्र कळलं कि हे, प्रारब्ध प्रारब्ध म्हणतात ते हेच..  


राहुल विठ्ठलराव भोईटे

12 comments:

  1. It was really a heart touching story 🥺

    ReplyDelete
  2. सुंदर शब्दांकन राहुल साहेब,डोळ्यासमोर प्रत्यक्ष चित्र उभे राहिले 🙏🙏🙏

    ReplyDelete
  3. Khup sundar sir. Angawar kate ubhe jhale vachtana. sundar

    ReplyDelete
  4. खरंच आहे. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. समर्थचे वचन किती समर्पक आहे.

    ReplyDelete
  5. सुंदर लेख राहुल.. आपण सगळेच काळाबरोबर धावतोय पण घरच्यांसाठी दोन मिनिटं देणं गरजेचं असतं नाहीतर मनामध्ये अशी खंत राहून जाते. एकाच ठेच पुढचा शहाणा, हे तुझ्या या गोष्टीतून शिकलं पाहिजे.

    ReplyDelete
  6. राहुल शब्दांमुळे पूर्ण प्रसंग डोळ्यासमोर आणलास फार सुंदर शब्दबद्ध केलं आहेस
    काकूंचं नेहमीप्रमाणे तुझ्याकडे लक्ष असणारच म्हणून आज शिक्षकांच्या रूपात तुला पुन्हा आई भेटली🙏🏻

    ReplyDelete
  7. खूप छान मांडणी...माझ्या ही डोळ्यात पाणी आले...म्हणूनच म्हणतात

    आई सारखे दैवत साऱ्या जगातावर नाही
    म्हणून श्री काराच्या नंतर शिकणे अ आ ई...

    नकोस विसरू कृण आईचे स्वरूप माऊली पुण्याईचे

    ReplyDelete
  8. तू तुझ्या भावना अतिशय छान रित्या शब्दांमध्ये उतरवल्यास हे प्रत्येकाला जमत असं नाही खूप छान

    ReplyDelete
  9. खूप सुंदर. अगदी अंतःकरणामधून लिहिलंस त्यामुळे मनाला भिडत.

    ReplyDelete
  10. Rahul, loved it! My mother went on 26th Jan 2024. Your mother's anniversary on 15th August triggered that thought.
    You lost her very young, that in itself is a pain that is so so tough to get over! I can imagine how much you miss her wish to talk to her.
    ❤️ beautifully articulated feelings and thoughts🤗

    ReplyDelete
  11. फारच छान राहुल.

    ReplyDelete

मनात हजार विचारांचा गुंता, आभाळ मात्र शांत..

मनात हजार विचारांचा गुंता, आभाळ मात्र शांत.. १० ऑक्टोबर | जागतिक मानसिक आरोग्य दिन सचिनच्या ऑफिसमध्ये सकाळी नेहमीप्रमाणे लगबग सुरू होती. कुण...