पाऊस थांबायचं नाव घेत नव्हता आणि आज संध्याकाळी आम्हांला उपवास सोडायला हॉटेल आशीर्वादाची खिचडी कढी खायची होती.. आता तरी पाऊस थांबेल आणि निघत येईल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होते.. ते म्हणतात ना " क्रॉस्ड फिंगर्स " कि काय त्याची आठवण झाली. आणि खरंच पाऊस कमी झाला, पोरांनी टणाटण गाडीत उद्या मारून तडक आशीर्वादाचा रस्ता धरला.. रिमझिम पडणारा पाऊस आणि जगजीत साहेबांची गाणी ऐकावी असा विचार केला परंतु स्वाभाविकच तरुण पिढीने मोबाईलचा कब्जा घेऊन अर्जित सिंगला सुरु केलं.. पण म्हणतात ना त्यात हि समाधान वेगळंच..
पुणे, ट्रॅफिक आणि रस्ते यांची म्हणजे युतीची आघाडी झाली आहे त्यामुळे रस्त्याने धक्के खात आम्ही कसबस कोथरूडला पोचलो, गुरुवारचा दिवस म्हणून हॉटेल फुल्ल... पण इच्छा तिथे मार्ग म्हणून कि काय, आमच्या कारला पार्किंग मिळालं आणि आणि आनंदात हॉटेल मध्ये एन्ट्री घेतली..स्वाभाविकच राजवाडेंच्या शिलेदारांनी हसत स्वागत करत त्यांचा कोकणी प्रेमळपण न बोलता दाखवून दिलं.. आणि झटपट जेवण सुरु केलं,
बघतो तर पलीकडे एक साधारण ८० वयाची वयस्कर व्यक्ती बसलेली दिसली, तशी नेहमी दिसणारी पण हो खूप जुन्या संपर्कातली, मी खुनावण्याचा प्रयन्त केला पण लक्ष नव्हते, थोडी अस्वस्थता वाटली कि काका एकटे आहेत कि काय, मग त्यांच्या आजू बाजूच्यांना खुणावून त्यांना बोलवा सांगितलं पण स्वारी जेवणात तल्लीन झाली होती.. शेवट माझंही जेवण झालं आणि बाजूला जाऊन भेटलो " काय काका कसे आहेत सगळे? हसून उत्तर आलं- अरे मी मस्त तू कसा आहेस. मी विचारलं एकटे आलात का? काका बोलले मी एकटाच फिरतो, आयुष्यभर भरपूर धावपळ केली, सौ गेल्या मुलीकडे मग आज वाटलं इकडे जेवण करावं, दोन पायाची सायकल काढली आणि आलो..
मला दोन पायाच्या सायकलची गम्मत वाटली आणि मी त्यांना बोललो, थांबा आज मी बिल भरतो तुमचं.. त्यावर उत्तर आलं अरे ऑलरेडी कोणी तरी भरलं आहे, कोणी तरी मुलगी होती मला आठवत नव्हती कोण पण तिला नको म्हटलं तरी तिने पैसे भरले.. आता तू परत डबल नको भरुस पैसे आणि हे वाक्य त्यांनी कमीत कमी ३ ते ४ वेळा सांगितलं मला. मग बोलले बाकी कसे आहे? पोर काय म्हणतात या गप्पा सुरु असताना, जुन्या आठवणी जाग्या करत काकांनी मनीषाला सांगूतलं अरे हा एवढा १० वर्षाचा असल्यापासून बघतोय.. असेच मजेत राहा आणि भेटत जा, घरी या एकदा.. मन जुन्या आठवणीत गेलं आणि त्या काळी काकांना गुरुवारी सुट्टी असताना आम्ही एकत्र पाहिलेले मराठी सिनेमे, भारत पाकिस्तानच्या मॅच असे अनुभव मनात तरळून गेले.. त्यांना म्हणालो आता तुमचे ऍडव्हान्स पैसे भरून ठेवतो इथे, पण त्याच उत्तर आलं, नको रे फक्त परत भेटलास कि आता मी स्वतः तुला हाक मारून आवाज देणार.. कदाचित यालाच समाधान म्हणतात कि काय??
बाहेर पाऊस थांबला होता आणि राजवाडे साहेबांकडून पान मसाला घेऊन आम्ही घरचा रस्ता धरला.. काकांना बोललो सोडतो घरी पण त्यांनी त्यांच्या दोन पायच्या सायकलकडे बोट दाखवले आणि आम्हाला धन्यवाद दिला... त्यांची पाठमोरी आकृती पाहत आम्ही गाडीला स्टार्टर मारला आणि घरचा रस्ता धरला...आता मात्र अर्जीतची जागा जगजीतने घेतली होती...
राहुल विठ्ठलराव भोईटे
