१५ ऑगस्ट २००० ची सकाळ थोडी धावपळीची असावी, फोटोफास्ट मध्ये सकाळी ८.३० ला पोचायचं म्हणून माझी आवराआवर सुरु असताना किचन मधून आईचा आवाज आला.."अरे हळदीचं दूध तरी घेऊन जा " पण मी घाईत होतो म्हणून नको म्हणून तिला न विचारताच बाहेर पडलो..
नेमकी राखी पौर्णिमा आणि १५ ऑगस्ट एकाच दिवशी असल्यामुळे कामाचा खूप लोड होता, दिवसभर काम झालं आणि साधारण ७.३० ला घरी आलो तर कळलं आईला पॅरालीसीस चा अटॅक आला होता , कृष्णा हॉस्पिटलला पोचलो पण कोमा मध्ये होती, तिची झुंज सुरु होतीच पण नियतीने १९ ऑगस्टला तिला आमच्याकडून हिरावून घेतलं. शेवटी बोलणं झालंच नाही..
आज बरोबर २६ वर्ष झाली, अनेक चांगले वाईट प्रसंग झाले पण हा प्रसंग नेहमी आठवणीत आहे.. आज सकाळी ऑफिसला निघताना विचार आला का बर असं झालं असेल, आईशी परत कधी बोलता येईल का आपल्याला? कि नाहीतर मग वर गेल्यावरच भेट... पण तेवढ्यात डहाणूकरचा सिग्नल सुटला आणि मागच्या गाडीच्या हॉर्नने मला भानावर आणलं
वैयक्तिक कामामुळे आज नेहमीचा रस्ता बदलून लोकमान्यनगरचा रस्ता घेतला, मग आठवले मी १९९९ ला मॉडर्न मध्ये असताना आमच्या मॉडर्न कॉलेजच्या डॉ.गंधे मॅडम इथेच राहतात या गुरु पौर्णिमेला त्यांना फोन केला तेव्हा लोकमान्यनगरच्या पोस्ट ऑफिस जवळ राहते कधीतरी घरी येऊन जा असे आग्रहाने सांगितलं. का कोणास ठाऊक तिथून जाताना हा विचार मनात यावा कि मॅडम भेटतील कदाचित आणि निव्वळ योगायोग मॅडम खरंच भेटल्या..
मी गाडी थांबवली आणि त्या बोलल्या " हेल्मेटमुळे ओळखलं नाही, तू राहुल ना " मी बोललो हो मॅडम , त्या बोलल्या मी ओळखते रे तुला, वेळ आहे का पण तुला कि ऑफिस ची वेळ चुकेल..
नाही म्हणत गप्पा झाल्या, मॅडमने नवीन पुस्तक लिहिलं त्याची माहिती दिली पण का कोणास ठाऊक आईच्या उंचीच्या आणि तिच्याच देहबोलीच्या मॅडमशी बोलताना डोळे कधी पाणावले कळलं नाही, त्यांना सांगितलं आज आईचे २६ वे पुण्यस्मरण आणि तुम्ही भेटला. मॅडम बोलल्या "अरे आमचा मैत्रिणींचा ग्रुप आहे रोज भेटत असतो चहाला कोणी ७५ च्या, तर कोणी ७० च्या पण आज उशीर झाला आणि आपण भेटलो."
काय योगायोग माझ्या आईच आणि मॅडमच वय एकच निघालं आणि अंगावर सरसरून काटा आला. मॅडमला मी बोललो आज आईची आठवण झाली आणि त्या बोलल्या अरे मी आईच आहे तुझी..तुझ्या सारखे विद्यार्थी भेटले कि एनर्जी मिळते..
डोळ्यात अश्रूंची गर्दी झाली. मॅडमने हि त्यांचा रस्ता धरला आणि मला मात्र कळलं कि हे, प्रारब्ध प्रारब्ध म्हणतात ते हेच..
राहुल विठ्ठलराव भोईटे