समानतेचे वारं...
दि.१५ ऑगस्ट २०२२
लेखक - राहुल भोईटे
नमस्कार, सर्वांत प्रथम सर्वांना अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि याच स्वातंत्र्याच्या जोरावर आपल्याला मनसोक्त आयुष्य जगण्याच्याहि शुभेच्छा...
खरेतर आपण जरी अमृत महोत्सवी वर्ष साजरे करत असू तरी, आपण याचा उपभोग घेण्यासाठी काय बलिदान केले आहे हा प्रश्न आपणांस पडत नाही का?
स्वातंत्र्यासाठी ज्या शूर वीरांनी बलिदान दिले याचा इतिहास आपण शाळेत शिकलो आणि तो सोयीस्कररित्या विसरलो ही.. कारण आज आपण स्पर्धा आणि स्वार्थीपणा याकरीता काहीही करायला मागे पुढे पाहत नाही हे जरी मनातून मान्य असेल तरी ते मला लागू नाही हा विश्वास मात्र सगळ्यांना असतोच... म्हणूनच की काय देशभक्ती, समानता, एकता ही आपल्याला केवळ १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला आठवते, अगदी त्या समानेते साठी आपण देशाचा झेंडाही सोडत नाही..
पण खरंच आपण समानता जपतो? आचरणात आणतो का? अहो १-२ वर्षात कोरोनाने आपल्याला माणुसकी आणि साधेपणा याची शिकवण देऊनही आपण माणूस म्हणून मिळालेल्या *" विसरणे"* या गुणांचा नेहमी तत्परतेने वापर करतो... कोरोना काळात हिंदू नव्हते की मुस्लिम, शीख नव्हते... होते केवळ माणूस आणि माणुसकीचे नाते, परंतू कोरोना आला आणि कदाचित सुट्टीवर गेला आहे असं वाटत, कारण आता अमृत महोत्सवी वर्ष आलं, सरकार बदललं, एवढाच काय तर लोकशाहीच प्रतीक असणाऱ्या निवडणुका आल्या.. आता सगळे सण कसे, समानतेने आणि दणक्यात साजरे करायचे!!
मग कोणाला एक वेळेचे अन्न मिळतंय कि नाही ? किंवा आपल्या उत्सवात कोणाला आपला त्रास होतोय का ?
या सगळ्याचा विचार न करता स्वातंत्र्याचा आपला आनंद उपभोगणे हेच आपलं आद्यकर्तव्य हो !!!
कारण आता सगळं छान आहे, देशही छान आणि जनताही छान कारण सगळं कस आहे समान...
रस्त्यावर भाजी विकणारा मुक्तपणे तुम्हाला डिस्काउंट देऊन समान तर, मॉल आणि शॉपिंग कॉम्प्लेक्स मध्ये गुपचूपपणे पैसे भरून आपणही समान... झेड पी च्या शाळेतली पोर आणि हायफाय बोर्डांमध्ये इंग्रजीची पोपटपंची करणारे ही समान... एवढंच काय तर जातीपाती वरून आरक्षण मागणारे ही समान आणि हे नाही मिळत म्हणून रडणारे ही समान..
रोज घरी बसून वर्क फ्रॉम होम करणारे आणि तरीही असमाधानी असणारेही समान आणि एम आई डी सी मध्ये १२ तास काम करून घाम गाळणारा कंत्राटी कामगारही समान...सिग्नल तोडणाराही समान आणि त्या बदल्यात तडजोड करणाराही समान.. पावसात भिजत भाजी विकणाराही समान आणि दादागिरीचे पैसे कमवून त्याच भाजीवाल्याकडून हप्ता घेणारेही समान...
रस्त्यावर थुंकणाराही समान आणि ती घाण न करताही साफ करणारा आपला सफाई कामगार ही समान .. रस्त्यावर आणि आपल्या सुंदर सोसायटीच्या खिडकीतून कचरा टाकणारा सुशिक्षित समान आणि या सगळ्यांवर केवळ चर्चा करून आपल्या देशात असेच होते म्हणणारा सुशिक्षित नागरिकही समान...
दिवस रात्र टी व्ही आणि ए सी साठी भांडणाराही समान आणि आपल्या पुढारलेल्या आणि सुसंस्कृत राज्याच्या लोड शेडिंग खाली दबलेला माझा शेतकरी मित्रही समान.. अहो अजून किती समानतेचं वारं वाहिलं पाहिजे सांगा बरं ??
अशा आपल्या सारख्या सर्व समान विचाराच्या मित्रमैत्रिणींना अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...
आपला मित्र,
राहुल भोईटे