Monday, November 11, 2024

वर्क लाईफ बॅलन्स काळाची गरज ?

जागतिक महासत्ता बनण्यासाठी जर चीनशी स्पर्धा करायची असेल तर कॉस्ट आणि क्वालिटी यावर करावी लागेल. आपली मानसिकता थोडी बदलावी लागेल. ते कितपत शक्य आहे हा मोठा प्रश्न आहेच परंतु, चीन नेहमीच लो कॉस्ट प्रॉडक्ट्स तयार करते, मुळात त्यात मोठा वाटा मनुष्यबळाचा आहे. सरासरी १२ तास काम करणे हा अतिशय कॉमन प्रकार आहे तिकडे. त्या विरुद्ध आपल्याकडे ८ ते ८.३० तास काम, आणि हे ८ तास अतिशय योग्य आहेत परंतु  त्यात सोशल मीडिया, व्हाट्सअँप आणि घर संसार करत काम सुरु असते. त्या बद्दल विचार केला तर बरेचदा कामगार आणि वरिष्ठ अधिकारी यामध्ये असणारी पगाराची दरी आणि असणारा कामाचा व्याप या गोष्टी समोर येतात..  त्यामुळे कामगारांची असणारी प्रॉडक्टिव्हिटी आणि त्याला साथ देणारी कर्मचाऱ्यांचा परफॉर्मन्स यात फार तफावत आहे...


पगार एक विषय सोडला तरी खरंच आपल्याकडील वरिष्ठ अधिकारी किंवा कर्मचारी आपल्या वेळेचा योग्य विनियोग करतात का हा मोठा विषय आहे? कोविड पुर्वी असणारी कार्यपद्धती आणि कोविड नंतर असणारी कार्यपद्धती यात बराच बदल झाला आहे. कोविड काळात लोक संपर्कात नसल्यामुळे सुरु झालेले व्हाट्सअँप ग्रुप आता कोविड जाऊन ४ वर्ष झाली तरी बंद होण्याचे नाव घेत नाहीत. बरेचदा प्रश्न पडतो व्हाट्सअँप आधी काम चालू होते कि नव्हते?? बरेच कॉर्पोरेट लीडर आपला ५० टक्के वेळ मीटिंग मध्ये घालवतात.


आता लगेच पाहिजे हा एक नवीन ट्रेंड सुरु झाला आणि त्या मुळे माणूस आपलं माणूसपण हरवून गेला कि काय असे वाटते. कोणत्याही गोष्टीसाठी ठराविक अशी कालमर्यादा असते आणि मग त्या वेळेत ती गोष्ट पूर्ण होते, परंतु कालानुरूप आपण हे विसरलो आहोत आणि त्यामुळे चुटकी सरशी सगळे हवे हि मानसिकता सगळीकडे झाली आहे, मग पिझ्झा डिलिव्हरी असो कि आपण विसरून गेलेली एखादी गोष्ट.. थांबणे, थोडा विचार करून गोष्ट करणे या गोष्टी आता कॉर्पोरेट मध्ये लो लीडरशिप म्हणून पहिल्या जातात. तुम्ही जेवढे अग्ग्रेसिव्ह तेवढे छान लीडर असा एक समज रूढ झाला असल्यामुळे फक्त आरडाओरडा करा आणि काम करून घ्या, या मानसिकतेचा प्रभाव सर्वसाधारणपाने दिसतो.. मग यामध्ये ती स्वतः व्यक्तीसुद्धा होरपळत असते याच भान त्यांना राहत नाही.. कारण समोर दिसणारी लाखो रुपयाची पॅकेज आणि मोठ्या पदाच्या प्रलोभनांमुळे आपण स्वतःला हरवत चाललो आहोत हे फार उशिरा कळते. 


काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीला भेटलो, जॉब कसा, मार्केट काय म्हणतंय याची चर्चा सुरु झाली.. सदर व्यक्ती २० वर्ष कॉर्पोरेट मध्ये काम करत असून अनेक मल्टि नॅशनल कंपन्यांमध्ये त्याने काम केले आहे, परंतु ४० शिमधील या तरुणाची नोकरी करण्याची उमेद थोडी कमी झाली कारण असणारे कॉर्पोरेट मधील राजकारण आणि सततचा ताण.. त्याने सांगितल्या प्रमाणे दिवसाचे २००० ते २५०० व्हाट्सअँप मेसेज आणि किमान १०० ते २५० फोन कॉल यामधून सुटका महत्वाची आहे असे त्याचे मत आहे.


भारतासारख्या सुजलाम सुफलाम आणि सर्व सुविधांनी, उत्तम शिक्षित मनुष्यबळ असणाऱ्या सुस्सज अशा देशात  कॉर्पोरेट राजकारण, आपल्या देशाचे राजकारण, जातपात, धर्म या पेक्षा उत्तम अशा वर्क लाइफ बॅलन्स आणि तणावमुक्त वातावरणासाठी योग्य नियमांची गरज जास्त आहे परंतु नुसत्या कागदोपत्री पॉलिसी नकोत, तर योग्य ठोस नियमावली आणि सर्वसमावेशक धोरण हवे, तेव्हा आपण खऱ्या अर्थाने जगात पुढे जाऊ.. अन्यथा कितीही मोठी कॉलेज आणि कितीही मोठ्या डिग्री झाल्या तरीही आपलं प्रोडक्शन व्हाट्सअँप वरूनच निघणार यात शंका नाही..


राहुल भोईटे

औद्योगिक आणि संस्थात्मक मानसशास्त्रज्ञ

Wednesday, August 28, 2024

समाधान


पाऊस थांबायचं नाव घेत नव्हता आणि आज संध्याकाळी आम्हांला उपवास सोडायला हॉटेल आशीर्वादाची खिचडी कढी खायची होती.. आता तरी पाऊस थांबेल आणि निघत येईल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होते.. ते म्हणतात ना " क्रॉस्ड फिंगर्स " कि काय त्याची आठवण झाली. आणि खरंच पाऊस कमी झाला, पोरांनी टणाटण गाडीत उद्या मारून तडक आशीर्वादाचा रस्ता धरला.. रिमझिम पडणारा पाऊस आणि जगजीत साहेबांची गाणी ऐकावी असा विचार केला परंतु स्वाभाविकच तरुण पिढीने मोबाईलचा कब्जा घेऊन अर्जित सिंगला सुरु केलं.. पण म्हणतात ना त्यात हि समाधान वेगळंच..

पुणे, ट्रॅफिक आणि रस्ते यांची म्हणजे युतीची आघाडी झाली आहे त्यामुळे रस्त्याने धक्के खात आम्ही कसबस कोथरूडला पोचलो, गुरुवारचा दिवस म्हणून हॉटेल फुल्ल... पण इच्छा तिथे मार्ग म्हणून कि काय, आमच्या कारला  पार्किंग मिळालं आणि आणि आनंदात हॉटेल मध्ये एन्ट्री घेतली..स्वाभाविकच राजवाडेंच्या शिलेदारांनी हसत स्वागत करत त्यांचा कोकणी प्रेमळपण न बोलता दाखवून दिलं.. आणि झटपट जेवण सुरु केलं, 

बघतो तर पलीकडे एक साधारण ८० वयाची वयस्कर व्यक्ती  बसलेली दिसली, तशी नेहमी दिसणारी पण हो खूप जुन्या संपर्कातली, मी खुनावण्याचा प्रयन्त केला पण लक्ष नव्हते, थोडी अस्वस्थता वाटली कि काका एकटे आहेत कि काय, मग त्यांच्या आजू बाजूच्यांना खुणावून त्यांना बोलवा सांगितलं पण स्वारी जेवणात तल्लीन झाली होती.. शेवट माझंही जेवण झालं आणि बाजूला जाऊन भेटलो " काय काका कसे आहेत सगळे? हसून उत्तर आलं- अरे मी मस्त तू कसा आहेस. मी विचारलं एकटे आलात का? काका बोलले मी एकटाच फिरतो, आयुष्यभर भरपूर धावपळ केली, सौ गेल्या मुलीकडे मग आज वाटलं इकडे जेवण करावं, दोन पायाची सायकल काढली आणि आलो.. 

मला दोन पायाच्या सायकलची गम्मत वाटली आणि मी त्यांना बोललो, थांबा आज मी बिल भरतो तुमचं.. त्यावर उत्तर आलं अरे ऑलरेडी कोणी तरी भरलं आहे, कोणी तरी मुलगी होती मला आठवत नव्हती कोण पण तिला नको म्हटलं तरी तिने पैसे भरले.. आता तू परत डबल नको भरुस पैसे आणि हे वाक्य त्यांनी कमीत कमी ३ ते ४ वेळा सांगितलं मला. मग बोलले बाकी कसे आहे? पोर काय म्हणतात या गप्पा सुरु असताना, जुन्या आठवणी जाग्या करत काकांनी मनीषाला सांगूतलं अरे हा एवढा १० वर्षाचा असल्यापासून बघतोय.. असेच मजेत राहा आणि भेटत जा, घरी या एकदा.. मन जुन्या आठवणीत गेलं आणि त्या काळी काकांना गुरुवारी सुट्टी असताना आम्ही एकत्र पाहिलेले मराठी सिनेमे, भारत पाकिस्तानच्या मॅच असे अनुभव मनात तरळून गेले.. त्यांना म्हणालो आता तुमचे ऍडव्हान्स पैसे भरून ठेवतो इथे, पण त्याच उत्तर आलं, नको रे फक्त परत भेटलास कि आता मी स्वतः तुला हाक मारून आवाज देणार.. कदाचित यालाच समाधान म्हणतात कि काय??  

बाहेर पाऊस थांबला होता आणि राजवाडे साहेबांकडून पान मसाला घेऊन आम्ही घरचा रस्ता धरला.. काकांना बोललो सोडतो घरी पण त्यांनी त्यांच्या दोन पायच्या सायकलकडे बोट दाखवले आणि आम्हाला धन्यवाद दिला... त्यांची पाठमोरी आकृती पाहत आम्ही गाडीला स्टार्टर मारला आणि घरचा रस्ता धरला...आता मात्र अर्जीतची जागा जगजीतने घेतली होती...

राहुल विठ्ठलराव भोईटे 

Friday, June 7, 2024

टीम वर्क

- टीम वर्क -

आज कालच्या या कॉर्पोरेट जगतात टीम वर्क या शब्दाला अतिशय महत्व आहे.. टीम वर्क (TEAM WORK). TEAM याची जर फोड केली तर तो असा असावा,

T - Together

E - Enjoy

A - Adjust

M - Motivate

टीम म्हटलं कि सगळे सारखे कधीच नसतात, कोणी तरी स्मार्ट तर कोणी तरी गहाळ आणि कोणी सांगकामे..

पण जर का सर्वांचा उद्देश एक असेल तर, या सर्वांचा योग्य वापर करून आपण हवे ते यश मिळवू शकतो. टीम वर्क साठी हवं असत ते योग्य मार्गदर्शन आणि योग्य वृत्ती. प्रत्येक व्यक्तीमधील नैपुण्य आणि त्याचा हातखंडा समजून घेऊन आपण त्याला योग्य काम दिल्यास ती व्यक्ती सकारात्मक तर राहतेच परंतु क्षमतेपेक्षा जास्त चांगले निकाल सुद्धा देते.  

T - Together   

आपण  एकजुटीने उभे राहणे महत्वाचे असते, प्रत्येक सदस्य त्यांची  कौशल्ये आणि दृष्टीकोन टेबलवर आणतो. सहयोग आणि मुक्त संवादाद्वारे, आपण अडथळ्यांवर मात करतो आणि आपली  उद्दिष्टे साध्य करतो. एकत्रितपणे, आपण  विश्वास आणि समर्थनाचे वातावरण जोपासतो, जिथे प्रत्येकाला आपले योगदान देण्यास मौल्यवान आणि महत्वाचे वाटते. आपली सामर्थ्ये एकत्रित करून आणि एका समान उद्देशासाठी कार्य करून, आपण आपल्या संघाची क्षमता वाढवतो आणि यश मिळवतो. एकत्रितपणे, आपण आपल्या यशाचा उत्सव साजरा करतो आणि आपल्या अपयशातून शिकतो.

E - Enjoy

समान दृष्टीच्या दिशेने एकत्र काम करण्यात आनंद शोधला पाहिजे. आपण एकमेकांचे यश साजरे केले पाहिजे आणि आव्हानांमधून एकमेकांना पाठिंबा दिला पाहिजे. एकत्रपणे आणि प्रोत्साहनाने, आपण  संघभावना जोपासली पाहिजे जी आपल्याला उत्कृष्ट कामगिरी करण्यास आणि एकत्र फरक करण्यासाठी प्रेरित करते.

A - Adjust

आपली उद्दिष्टे साध्य करण्यासाठी लवचिकतेचे महत्त्व ओळखून आपण परिस्थितीशी जुळवून घेतले पाहिजे.  विविध विचारांचा स्वीकार करून आणि एकमेकांच्या सामर्थ्याचा आणि कमकुवतपणाचा आदर करून, आपण एक सहयोगी वातावरण तयार करू शकतो जिथे प्रत्येकजण प्रगती करू शकेल. आपसातील समंजसपणा आणि सहकार्याद्वारे, आपण अडथळ्यांना एकत्र पार करून आपल्या संघाचा विकास करू शकतो.

M - Motivate 

उत्कटतेने आणि दृढनिश्चयाने आपण एकमेकांना प्रेरणा देऊ शकतो. या करीता Mi  पेक्षा We

ला प्रोत्साहन दिले पाहिजे. एकत्रितपणे, आपण यश साजरे करतो आणि आव्हानांमध्ये एकमेकांना पाठिंबा देतो. सामायिक उद्दिष्टे आणि अतूट पाठिंबा, आपल्या संघाला यशाकडे नेतो. 


चला तर मग यशस्वी टीम बनवूया...

Together we Can, Together We Will...

राहुल विठ्ठलराव भोईटे

Monday, August 15, 2022

समानतेचे वारं..

समानतेचे वारं...

दि.१५ ऑगस्ट २०२२

लेखक - राहुल भोईटे


नमस्कार, सर्वांत प्रथम सर्वांना अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि याच स्वातंत्र्याच्या जोरावर आपल्याला मनसोक्त आयुष्य जगण्याच्याहि शुभेच्छा...


खरेतर आपण जरी अमृत महोत्सवी वर्ष साजरे करत असू तरी, आपण याचा उपभोग घेण्यासाठी काय बलिदान केले आहे हा प्रश्न आपणांस पडत नाही का?


स्वातंत्र्यासाठी ज्या शूर वीरांनी बलिदान दिले याचा इतिहास आपण शाळेत शिकलो आणि तो सोयीस्कररित्या विसरलो ही.. कारण आज आपण स्पर्धा आणि स्वार्थीपणा याकरीता काहीही करायला मागे पुढे पाहत नाही हे जरी मनातून मान्य असेल तरी ते मला लागू नाही हा विश्वास मात्र सगळ्यांना असतोच... म्हणूनच की काय देशभक्ती, समानता, एकता ही आपल्याला केवळ १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला आठवते, अगदी त्या समानेते साठी आपण देशाचा झेंडाही सोडत नाही.. 


पण खरंच आपण समानता जपतो? आचरणात आणतो का? अहो १-२ वर्षात कोरोनाने आपल्याला माणुसकी आणि साधेपणा याची शिकवण देऊनही आपण माणूस म्हणून मिळालेल्या *" विसरणे"* या गुणांचा नेहमी तत्परतेने वापर करतो... कोरोना काळात हिंदू नव्हते की मुस्लिम, शीख नव्हते... होते केवळ माणूस आणि माणुसकीचे नाते, परंतू कोरोना आला आणि कदाचित सुट्टीवर गेला आहे असं वाटत, कारण आता अमृत महोत्सवी वर्ष आलं, सरकार बदललं, एवढाच काय तर लोकशाहीच प्रतीक असणाऱ्या निवडणुका आल्या.. आता सगळे सण कसे, समानतेने आणि दणक्यात साजरे करायचे!! 

मग कोणाला एक वेळेचे अन्न मिळतंय कि नाही ? किंवा आपल्या उत्सवात कोणाला आपला त्रास होतोय का ? 

या सगळ्याचा विचार न करता स्वातंत्र्याचा आपला आनंद उपभोगणे हेच आपलं आद्यकर्तव्य हो !!! 


कारण आता सगळं छान आहे, देशही छान आणि जनताही छान कारण सगळं कस आहे समान...

रस्त्यावर भाजी विकणारा मुक्तपणे तुम्हाला डिस्काउंट देऊन समान तर, मॉल आणि शॉपिंग कॉम्प्लेक्स मध्ये गुपचूपपणे पैसे भरून आपणही समान... झेड पी च्या शाळेतली  पोर आणि हायफाय बोर्डांमध्ये इंग्रजीची पोपटपंची करणारे ही समान... एवढंच काय तर जातीपाती वरून आरक्षण मागणारे ही समान आणि हे नाही मिळत म्हणून रडणारे ही समान..


रोज घरी बसून वर्क फ्रॉम होम करणारे आणि तरीही असमाधानी असणारेही समान आणि एम आई डी सी मध्ये १२ तास काम करून घाम गाळणारा कंत्राटी कामगारही समान...सिग्नल तोडणाराही समान आणि त्या बदल्यात तडजोड करणाराही समान.. पावसात भिजत भाजी विकणाराही समान आणि दादागिरीचे पैसे कमवून त्याच भाजीवाल्याकडून हप्ता घेणारेही समान... 


रस्त्यावर थुंकणाराही समान आणि ती घाण न करताही साफ करणारा आपला सफाई कामगार ही समान .. रस्त्यावर आणि आपल्या सुंदर सोसायटीच्या खिडकीतून कचरा टाकणारा सुशिक्षित समान आणि या सगळ्यांवर केवळ चर्चा करून आपल्या देशात असेच होते म्हणणारा सुशिक्षित नागरिकही समान...

दिवस रात्र टी व्ही आणि ए सी साठी भांडणाराही समान आणि आपल्या पुढारलेल्या आणि सुसंस्कृत राज्याच्या लोड शेडिंग खाली दबलेला माझा शेतकरी मित्रही समान.. अहो अजून किती समानतेचं वारं वाहिलं पाहिजे सांगा बरं ?? 

अशा आपल्या सारख्या सर्व समान विचाराच्या मित्रमैत्रिणींना अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...


आपला मित्र,  

राहुल भोईटे

Saturday, July 23, 2022

"न हारणारी होडी"


                                                                     "न हारणारी होडी"

पावसाळा ऋतू म्हणजे अनेक गमती जमतींचा ऋतू...बरेचदा न उघडणारा पाऊस त्रास वाटतो, तर तो २-३ दिवस आला नाही कि हुरहूर पण वाटते.. कोरोना नंतरच्या अनिश्चिततेच्या वातावरणात आपण अनिश्चितता स्वीकारली असं म्हणता येईल कदाचित..

याच वातावरणात आपणही आपल्या बालपणातील अनेक आठवणींना उजाळा देत असतो..अशीच एक आठवण म्हणजे " होडी  " शाळेत असताना हस्तकला हा विषय जरी असला तरी त्यात जे शिकलो त्यात लक्षात राहिलेली आणि अजून हि तयार करता येणारी कागदाची होडी हा नेहमीच आवडता उद्योग..

याच उद्योगाचा भाग म्हणून वेदांत आणि तन्मयला घेऊन  मागच्या रविवारी कागदाच्या होड्या बनविण्याचा बेत पूर्ण झाला. कार्ड शीटच्या होड्या, वृत्तपत्राच्या कागदाच्या होड्या तर काही पेपरात येणाऱ्या जाहिरातींच्या होड्या... 

पुढचा बेत होता त्या सोडण्याचा.. आता होड्या झाल्या  पण आधी अतिवृष्टी मुळे आणि नंतर पाऊस बंद यामुळे.. पुन्हा एकदा अनिश्चितता आणि हुरहूर याचा अनुभव घेत वेदांत तात्यांनी प्रश्न सुरु केले.. कधी आणि कुठं सोडायच्या होड्या??

आज उद्या करत अखेर मुहूर्त लागला, वेदांत आणि मी मुठा नदीकडे मोर्चा वळवला, नदी आणि पाणी याच आपल्या शहरी भागातील मुलांना कुतुहूल तर असणारच... म्हणून आधी नांदेड सिटी पुलावरूनच बोटी सोडू असं ठरलं पण, विचार केला पुलावरून टाकली तर बुडेल कि काय म्हणून बाजूने नदीपात्रातील खडकांवर दोघेही उतरलो, एकमेकाना आधार देत शेवटी कसे बसे पोचलो पात्राजवळ... आता तात्या मूड मध्ये होते होड्या पाण्यात टाकण्याच्या... १-२ होड्या सोडल्या पण त्याचा पहिला अनुभव असल्या मुळे एक होडी उलटी झाली तर दुसरी कशी बशी पुढे मार्गक्रमण करू लागली.

होडीच्या प्रवासाचा आनंद घेत वेदांतने कार्डशीट ची बनवलेली होडी सोडली आणि अपेक्षेप्रमाणे ती भराभर पुढे हि गेली...आधीच्या १-२ होड्या मात्र अडखळत मागे पडल्या होत्या.. वेदांत मला विचारात होता त्या का पुढे नाही जात आहेत..मी बोललो जातील तू त्या पुढे गेल्या आहेत त्या बघ...

इतक्यात आपल्या स्वतंत्र भारतातली सुजाण नागरिकाने घरचे पिशवीभर निर्माल्य पुलावरून नदीत फेकले.. वेदांत मला सांगू लागला किती कचरा टाकला त्या काकांनी आता त्या १-२ होड्या अडकतील ना? मी हि त्याला पुन्हा त्या पुढे गेलेल्या होड्या दाखवत घराचा रस्ता धरला.. 

घरी आलो तर तन्मय शेठ नाराज, त्यांना बरोबर नेलं नाही म्हणून ..साहेबांची नाराजी दूर करण्यासाठी पुन्हा ३-४ होड्या बनवून आमच्या तिघांचा मोर्चा पुन्हा मुठा नदी नांदेड पुलाकडे वळला.. आता नदीपात्रात उतरताना वेदांताचा आत्मविश्वास पहिल्या पेक्षा वाढला होता, झटक्यात पुन्हा होडी सोडण्याच्या पॉइंटला आलो आणि पुन्हा होड्या सोडायला सुरुवात करणार तोच वेदांतच लक्ष मघाशी सोडलेल्या पण बाजूला आलेल्या त्या एका होडीकडे गेले. आपण घरी जाऊन आलो तरी ती तिथंच कशी 'पप्पा?? 

मी त्यांना बोललो अरे नवीन होड्या सोडा आधी मग आपण बघू... तोवर नव्या होड्या मुठेच्या प्रवाहात मिसळल्या आणि छान मार्गक्रमण करत गेल्या सुद्धा...

आता ती बाजूला आली होडी बघून तन्मय ने ती बाहेर काढली आणि पुन्हा पाण्यात सोडली, थोडी गचके खात ती थोडं पुढे गेली आणि परत थांबली. परत थोडं पुढं गेली आता पुलाखालून येणार एक जोरदार प्रवाह येऊन तिला धडकला आणि तिने २-३ गिरक्या घेत आपला मुठा नदीतील  प्रवास पुढे सुरु केला.. नजर वळेपर्यंत तिने जोरदार प्रवास सुरु केला होते...

स्कुटीला स्टार्टर मारत मी मुलांना बोललो... कधी कधी काही गोष्टी उशिरा सुरु होतात पण थांबत नाहीत.

सुरुवात हळू झाली म्हणजे पराभव नाही, तर जिंकण्याची संधी असते.. असे अनेक अनुभव येतील पण न थांबता प्रयत्न करा, विजय हा ठरलेलाच आहे..

राहुल भोईटे.

Monday, May 23, 2022

 डास आणि सकारात्मकता....


प्रसंग १ 

नमस्कार, गेले काही महिन्यांपासून सोसायटी परिसरात डासांचा प्रादुर्भाव खूप वाढला होता, स्वाभाविक सोसायटी मध्ये पेस्ट कंट्रोल करून काही कमी होईल असं वाटलं म्हणून तेही  केलं, परंतु हा प्रभाव फक्त काही दिवसच राहिला. सतत चर्चेचा विषय झाला तो म्हणजे डास, बघावं तिकडं डासच डास...

योग्य ती फवारणी करून ती तक्रार काही प्रमाणात सुटली... परंतु हि सोय सुद्धा तात्पुरतीच..


तात्पर्य - नुसता विचार करून काही होत नाही, तर त्याला कृतीची जोड लागते. पण त्या कृतीतुन अपेक्षित यश येईल याचा भरवसा नाही...



प्रसंग २ 

नेहमी गजबज असणाऱ्या एन डी ए रोड वरून येताना एका ठिकाणी अतिक्रमण कार्यवाही होताना दिसली, सगळ्या भाजी, फळांच्या टोपल्या उचलल्या जात होत्या, लोकांची धावपळ सुरु होती, मनात पहिला विचार आला, चला काही तरी सकारात्मक होतंय, अनधिकृत फेरीवाल्यांवर कार्यवाही होतेय, वाहतुकीला होणार त्रास कमी होईल, वेळेवर घरी जातायेईल, त्या  भाजीवाल्यांमुळे होणारी गर्दी कमी होईल, अपघातांची शक्यता कमी होईल, असे एक ना अनेक सकारात्मक विचार घेऊन मी गर्दीतून गाडी चालवत पुढे आलो. मुलगा बरोबर होता, त्याचा विचार होता, या बिचाऱ्यांचं नुकसान झालं,कोणाचं घर चालत असेल यावर, तर कोणी संध्याकाळच्या भाकरीची वाट बघत असेल....


तात्पर्य - नियम आणि शिस्तीपोटी कोणी खरा गरजवंत चिराडला जात नाही ना ?


प्रसंग ३ 

एक दिवस सुट्टीच्या दिवशी काही कामानिमित्त बाहेर जाण्या साठी गाडी काढली, सोसायटी गेट जवळ जाईपर्यंत, लक्षात आलं कि, डासांचा प्रश्न मिटलेला नाही, कारण दिसलं कि गाडीमध्ये २ डास आहेत, त्यांना बाहेर जाता यावे म्हणून खिडकीच्या काचा खाली घेतल्या, परंतु ते काही बाहेर जायचं नाव घेईनात. शेवटी कसे बसे बाहेर गेले, तोवर गाडी एन डी ए रोडवर आली होती, बाहेर पाहिलं तर सगळं रस्ता सामसूम, भाजीवाले नाहीत, फळवाले नाहीत, मधेच एका ठिकाणी एक लहान मुलगा पालेभाजीवर पाणी शिंपडताना दिसला, पण नजर कावरी बावरी, कधी गाडी येईल आणि सामान उचलून नेईल.. 


गणपती माथ्याच्या पुढे आलो आणि का कोणास ठाऊक पुन्हा गाडीत डास आहे का भास झाला, आपोआपच हात खिडकी उघडायला गेला, परंतु बाहेरून अतिक्रमण पथकाचा कर्मचारी जाताना दिसला.. आणि सगळे सकारत्मकतेचे विचार गळून पडले...


तात्पर्य - आजकालच्या या धकाधकीच्या काळात, कळत नकळत, आपण आपल्या सोयीसाठी किती तरी गोष्टी करत असतो, परंतु याचा इतरांच्या आयुष्यावर काही परिणाम होईल का याचा विचार आपण करत नाही.  

Wednesday, June 9, 2021

जून चा पाऊस जुना की नवा ....

 जून चा पाऊस जुना की नवा ....

                                     

आज सकाळी पुणे मुंबई महामार्गा वरून प्रवास करताना नकळत बरेच विचार डोकावून गेले... 

रिम झीम पाऊस सुरु झाला होता... पहिला प्रश्न पडला जून चा पहिला आठवडा म्हणजे हा मोसमी पाऊस  की पूर्व मोसमी पाऊस??

खरं तर पाऊस तो पाऊसच की, पण टेक्नॉलॉजी बरोबर आपण हि अत्यंत चिकित्सक झालो आहोत असं वाटत, प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी जाण्याचा हा गुणधर्म चांगला की वाईट हा चर्चेचा विषय ठरू शकेल...

घोरावडेश्वराचा डोंगर साद घालत होता... बोलला आहे का भिजायची डेअरिंग... पण आमचं लक्ष मात्र गाडीच्या स्पीडोमीटर कडे, अहो ८० च्या खाली स्पीड आलं तर पुढे लागणार ट्रॅफिक, लागणारा लेट मार्क यांच्या विचारांनी ठरवलं मनातच पाऊस एन्जॉय करावा !!

शाळेत असताना जून चा पाऊस म्हणजे गजाने रोवा रोवी, आंब्याच्या कोयांनी खेळायचे खेळ, भोवरा, गोट्यांचं रिंगण ( त्याला अंड म्हणायचे), असे एक ना अनेक खेळ काही क्षणात डोळ्या समोरून गेले...

हाफ चड्डी मध्ये बिन चप्पलचे ते पाण्याच्या डबक्यातून पळणं, आणि या सगळ्या लफड्यात चाळीतल्या पिंट्या कडून हरलेल्या गोट्या जिंकण्यासाठी पुन्हा एकदा दिलेली आरोळी... आहे का आवाज ??

समोरच्या लेन मधून ओव्हरटेक करत जाणाऱ्या बी . एम. डब्लू वाल्याने मध्येच हॉर्न वाजवून पुन्हा पुणे मुबंई रोडवर आणलं... 

विचार आला आज ऑक्सिजन च्या कारखान्याच्या उभारणीसाठी धडपडणारे आपण हे सगळं कुठं हरवून आलोय... मे चा आंब्याचा हंगाम संपला की त्या कोयी जमिनीत लावणारे आपण, त्याचं कोयीचे छोटे रोपटं झाल की त्याला कौतुकाने बघणारे हि आपणच, आणि त्या कोवळ्या पानाचं झाड होईल या आशेवर जगणारे हि आपणच.. त्या जून मधली किती तरी अशी आंब्याची रोपटी वृक्षांमध्ये रूपांतरित झाली असतील, परंतु आपण मात्र जगण्याच्या धडपडी  मध्ये ती वाढ हरवून बसलोय की काय असा प्रश्न हि पडून गेला !!

चाकण ला पोहोचलो आणि आता ऑफिसच्या खिडकीतुन समोर डोंगर आणि त्या वर धावणारे ढग खुणावत होते... ढग धावत होते पण डोंगर मात्र एकाच ठिकाणी होता... ते नयनरम्य दृश्य डोळ्यात टिपून घेत एक खूणगाठ मनाशी बांधली... पावसाळा कोणताही असो भिजण्याचा आनंद न गमावता जगण्याचा आनंद घेतला की आपण हि त्या ढगां सारखेच आयुष्यचा निखळ आनंद घेतो मग तो पावसाळा कोणता हि असो जुना की नवा !!!

जुन्या नवीन पावसाच्या शुभेच्छा..


राहुल विठ्ठलराव भोईटे 

Friday, June 4, 2021

एच. आर - प्रवेश इमोशन्सच्या विश्वात...

एच. आर - प्रवेश इमोशन्सच्या विश्वात...



नमस्कार मी राहुल विठ्ठलराव भोईटे एच. आर प्रोफेशनल, १६ वर्ष औद्योगिक क्षेत्रात कार्यरत आहे.

सदर कथा माझ्या एच. आर मधील पहिल्या दिवस संदर्भात आहे.

२००४ चा काळ हा माझ्या सारख्या नवशिख्या साठी तस खडतरच होता. रसायन शास्त्राची पदवी घेऊन पुढे काय ? मग MBA एच आर करून नशीब आजमवुया असा विचार केला. 

औद्योगिक मंदीचे वातावरण असल्याने नवीन जॉब मिळणं तसं कठीणच होते. पण नशिबाची साथ मिळाली आणि लोणावळ्याच्या एका मॅनुफॅक्चरिंग  कंपनी मध्ये एच आर चा जॉब मिळाला.

पहिल्या दिवशी जायचं तर कंपनी ६० किलोमीटर लांब. सकाळी ७ ला CD 100 SS ला किक मारली आणि निघालो लोणावळ्याला. कंपनीच्या गेट वर सेक्युरिटीने अडवलं, सर्व प्राथमिक चौकशी जसे कि - कोणाला भेटायचं, कोठून आलात, काय काम आहे आणि सोबतीला दिला एक गेट पास...

तो काळ ऍडमिनिस्ट्रेशन आणि पर्सनल मॅनॅजमेण्ट चा होता. कंपनी मध्ये गेल्या वर पर्सनल इन्फॉर्मशन आणि 

जॉइनिंग फॉर्मॅलिटीएस करून मला थेट एका घड्याळ समोर नेलं.

प्रसंग १ -

सकाळचे ९ वाजले होते. जिथे उभा होतो तिथे पंचिंग कार्ड आणि तिथे ३ प्रकारचे शेल्फ लावलेले होते. त्या मध्ये रंगी बिरंगी कार्ड, अगदी आपली जुने पोस्ट कार्ड असतात तशी लावलेली होती. एका शेल्फ मध्ये पिवळी, दुसऱ्या मध्ये निळी आणि तिसऱ्या मध्ये लाल... माझ्या वरिष्ठाने सांगितलं हि सगळी कार्ड कधी आणि ऑफिस मध्ये घेऊन ये. मी हि तेच केलं, आणि सगळी कार्ड घेऊन ऑफिस मध्ये आलो. माझ्या वरिष्ठाने काही मोठी रजिस्टर दिली आणि सांगितलं कि याला म्हणतात हजेरी बुक... एक कार्ड एन्ट्री कस करायचं ते सांगून त्यांनी मला सगळी कार्ड आणि रजिस्टर सुपूर्त केली आणि स्वारी चहा ला निघून गेली.

माझ्या साठी हा सर्व प्रकार नवीन होता, पण सोबत हि कोणी नव्हतं. शेवटी कार्ड वरची नाव आणि रजिस्टर मधली नाव त्यांची बेरीज वजाबाकी करत कशी बशी काही कार्ड पूर्ण केली, वरिष्ठ आले, त्यांनी पाहिलं आणि शाबासकी दिली. बरं वाटलं, पण पुढे काय वाढून ठेवलं हे मात्र मला माहित नव्हतं.


साधारण ११ वाजता भोंगा झाला, जेवणाची सुट्टी झाली. मला घेतलेले कार्ड परत लावायला सांगितली.

मी उत्साहाच्या भरात ती लावायला सुरवात केली. पण मी नवीन या असल्याने  मला काही कार्डचा क्रम माहित नव्हता. आणि सकाळी लवकर निघाल्या मुळे पोटात कावळे ओरडत होतेच.. भराभर कार्ड कोंबून आधी डबा संपवायचा प्लॅन होता. पिवळी कार्ड लावली, लाल कार्ड लावली, कामगारांची जेवणाची वेळ संपत आली होती, माझ्या सारखा नवीन कार्यकर्ता काय करतोय हे बघण्याची त्याची उत्सुकता मला जाणवली. पिवळ्या कार्ड शेल्फ मधली काही कार्ड काही लोकांनीच स्वतः खाली वर केली, आणि मला फक्त बघून निघून गेले.निळी कार्ड लावण्याचं काम सुरु असताना एक जण आज आला आणि म्हणाला, माझं कार्ड खाली का लावल?


मी सिनियर युनिअन लीडर आहे माहित नाही का? चल तुझ्या साहेब कडे...थोडा भडकलेला वाटला..

हि माझ्या साठी पहिली शिकवणी.. साहेबानी सांगितलं "नया है वह". मी सांगतो त्याला...

तो गेल्या वर साहेबानी सांगितलं, आधी युनिअन लीडर ची कार्ड मग स्टाफ ची कार्ड आणि मग खाली कॉन्ट्रॅक्ट ची कार्ड...आता त्याला चहा ला भेट...


प्रसंग दुसरा - 

दुपारचं जेवण संपवून पुन्हा एकदा जागेवर येऊन बसलो, तर तोच युनिअन लीडर आला, काय साहेब चला चहा घेऊ या... आणि आम्ही कॅन्टीनला जाताना पुन्हा पंचिंग मशीन जवळ गेला. त्याने सांगितलं, कस आहे साहेब, आमचं कार्ड नेहमी वर असत, नाही तर आम्हाला कोण लीडर बोलणार??


संध्याकाळी गाडीवर जाताना विचार केला कि हे असे मतभेद का असतील...

प्रसंग अगदी छोटाच पण बरंच काही शिकवून गेला.. कारण मी माणसांच्या इमोशन्स च्या विश्वात एन्ट्री केली होती. माणसं समजा, आणि पुढे चला...

इथे जे शिकायला मिळालं ते पुढे नेहमी कामी आलं, आम्ही एच आर म्हणून नेहमी लोकांशी संपर्क साधत असतो, प्रत्येकाचे इमोशन्स आणि कंपनीचे नियम सांभाळत कसरत कशी करावी लागते याची ती सुरुवात होती.....

आज १६ वर्षांनंतर मागे वळून पाहताना असे दिसतंय कि त्या पंचिंग मशीनची जागा आता बायोमेट्रिक मशीन ने घेतलीय आणि सर्व रंगभेद बाजूला केलेत...

असो या प्रसंगी इतकंच कि अजूनही लाल रंगाच्या कार्डची पोझिशन साठी कोणी हुज्जत घालत नाहीत... आणि हो लोणावळ्याला  गेलं कि युनिअन लीडर साहेबानं बरोबर चहा हि चुकत नाही...

धन्यवाद..

राहुल भोईटे.


Monday, December 28, 2020

Be the change that you wish to see in the world.

 Namaskar, Myself Rahul Vitthalrao Bhoite, HR professional with 16 years of experience from manufacturing, Telecom, Infrastructure industry.

“Be the change that you wish to see in the world.” ... this is the learning for me during this Corona Pandemic. Many think Corona created negative impact on the minds of Human beings. But I will say we have to be positive in every situation we came across and this will help us in positive results.

So here I start with my HR story – Its slow down of businesses all over the world since last November 2019 whatever the market trends & company performances every employer has to pay salaries to their employees as its “right of the employee.”

The days are passing and we are going deep in the financial crunch, suddenly we heard the terms like Corona, Covid 19 around late January 2020 ours is Small Scale Manufacturing company which not mostly dealing with other countries so the impact of term Corona reached us late than other IT or MNC companies. In continuation with industry trend we also started prevention, care and employee first approach by starting Sanitization, social distancing, temperature checks for employees. But with guidelines of Government Of India we stopped our Operations from 22nd March 2020.

The time was running with culture of WFH but being manufacturing facility we have limitations as well. Unless until we manufacture we can’t build the revenue. Money is the necessity of every business, if can’t generate then we have to look for options like Salary Cut downs, manpower reductions etc. Here Balance of employee satisfaction & employee engagement is again will be the big challenge. Employees are working from home & always having pressure of all emotional, financial; social needs satisfaction which is very different condition for all of us. Every individual is experiencing the word “VUCA” in reality by the end of March 2020 as the new financial year was calling for new targets, new budgets. 

Role of HR is very crucial in this period we have started to connect employees over calls, started zoom meeting with Functional heads & there second lines, but yes there is always fear in mind everyone how to cope the situation & what will be the future. We as organization having employee meetings wherein we are discussing about well-being & learning opportunities for every individual.

I personally taken this situation as learning time & completed 12 HR Certification courses which includes How to Engage employees, How to motivate employees and many more like this. These courses helped me to be more positive & focused to face the Pandemic situation.

We as organization having culture of celebrating Family day every year in the month of May. Fortunately I witnessed the program for last 3 years. The common agenda of this program is to connect with employees & make them feel proud of the organization they work for. This program was become DNA of the organization & every individual is waiting for the same every year.

Every year we use to arrange the event for employees & all there family members including contract employees. The program consists of Cultural events, Dance. Singing, Plays, Motivational programs & dinner with families will be icing on cake.

Corona has stolen our Cake ??

During one of the zoom meeting of our top officials in the month Of April new thought came why we should not do Family Day Online? And here the spark ignited… But for us its again new challenge as Skype, Zoom are the words for many of us, then what about Operators, Contract labours??

We initiated the thought and started to act on this by creating various departmental groups & started guiding them for use of Zoom/ Skype. Here comes the concept of new learning & leadership for all those line supervisors who took the lead in starting the concept of virtual family day.

Many of them use to conduct Zoom calls for their respective team members who are ITI Operators, SSC passed contract labours, but yes we delegated them & we have easily complete the task of training 400 employees in the span of 2 days. The plan was of having program of 30 minutes.

The next challenge was to increase the participation of individuals. We have created whatsapp group of employees wherein we have branded our event with help of last year event photographs, event teasers, we have asked individuals to shoot there songs/ dance videos/ Music videos of 2 minutes and asked them to share to Event coordinators who are our employees only. Slowly the momentum was getting build and we were getting many vidoes, stories, paintings made by employees & their family members. Few employees shared the Kaizens which they implemented at their homes.

This in turns motivated the employees & their families as well. We implemented virtual Deep Prajvalan (Lighting the lamp). And good part is that many employees did this while managing there WFH meetings, Official calls as well. And at the end we got 30 entries for program which results in 1 hour Virtual Family Day program.

The day came where we have planned for launching the YouTube link around 5 pm with all employees & enjoys the program with families at home. Suddenly I receive call from my top officials around 4.30 pm that we need to create more enthusiasm by putting few live videos for more participation. Was seating with my kids & was unaware of the sudden demand. I dressed up in Marathi traditional dress & did video of appealing employees for participation which created impact & appreciated by many employees.

Finally we realised the YouTube Link with all employees & employees watched the event video online along with their families. Many employees shared their photographs, selfies with their families & friends. This was really motivating for me as individual as I receive many calls from employees & management for appreciation.

For the size of 300 employees its great success & new learning for me, which definitely created the positive, impact on the minds of employees & their families too. It really boosts the employee moral & motivated them to work for the organization which brings the family culture.

We experienced the same as with the permission of Government authorities we stated our production operations in the first week of May where employees participated on their own without any compulsion from management for attending the duties.

The learning from above story is,

·         Take care of people & people will take care of you.

·         Change is always good, accept it & get succeed..

·         Together we can & together we will!!


Written by- Rahul Viitthalrao Bhoite

https://www.linkedin.com/in/rahulbhoite1378

Saturday, December 5, 2020

शिक्षण एक गेट पास कि काय ??

बालपणीचा काळ सुखाचा, मजा करा, खेळ आणि बागडा हे समीकरण असणाऱ्या काळात आपण वाढलो, साहजिकच शिक्षण हि काळाची गरज या बद्दल अजिबात हि दुमत नाही. परंतु काळाच्या ओघात हि गरज कधी व्यवसाय बनली हे कळलंच नाही.


आजकालच्या या स्पर्धेच्या युगात ज्याला आपण व्हुका  वर्ल्ड (VUCA World) असे म्हणतो, 

V = Volatility म्हणजे अस्थिरता 

U = Uncertainty म्हणजे अनिश्चितता 

C = Complexity म्हणजे गुंतागुंत 

A = Ambiguity म्हणजे अस्पष्टता 

यात खरंच प्रचंड अस्थिरता, अनिश्चितता, गुंतागुंत, अस्पष्टता आहे हे मात्र खरंच ..कोरोना च्या काळात आपण जी शिक्षण पद्धती अनुभवत आहोत त्या वरून विद्यार्थ्यांची गुणवत्ता केवळ मार्कांमध्ये मोजणे  कितपत योग्य आहे याचा प्रश्न आता पडू लागला आहे. 


बौद्धिक क्षमते बरोबरच काही मूलभूत गुण हे असतील तर कदाचित आपण या व्हुका  वर्ल्ड  (VUCA World )  मध्ये टिकू शकतो.


कोणे एके काळी गुरुकुल पद्धत होती, नंतर काळाप्रमाणे बदलत आज घरकुल शिक्षण पद्धत ( online school )  आली. बदल हा नेहमी सकारात्मक पद्धतीने स्वीकारला पाहिजे. 

कदाचित याच हे एक उदाहरण असेल. आजच्या अँड्रॉइड मोबाईलच्या जमान्यात बटनाचे मोबाइलला किती लोक वापरतात??


परंतु कोरोना जर आला नसता तर आपण  online Education  एवढे सहज स्वीकारलं असत का ??


प्रत्येक गोष्टींमध्ये काही तरी सकारात्मक आहे असा दृष्टिकोन ठेवणं गरजेचं आहे. आपल्या कडे काय नाही या साठी रडत बसण्यापेक्षा काय आहे आणि काय करता येईल या साठी प्रामाणिक प्रयत्न करणे हे हि तितकेच महत्वाचे आहे.

 

तर सध्याच्या सो कॉल्ड व्हुका  वर्ल्ड (VUCA Corporate World) मध्ये टिकायचं असेल तर शिक्षणा बरोबर तुमचा सकारात्मक दृष्टिकोन अतिशय महत्वाचा आहे. अमुक बोर्ड, तमुक कॉलेज या मध्ये मुलांना अडकवून ठेवण्या पेक्षा त्यांच्या असणाऱ्या उपजत गुणांना हेरून त्यांना प्रोत्सहन दिले तर आपणंच मुलांना यशस्वी बनवू शकतो.

 

कॉर्पोरेट जगतात काम करत असताना आपण जे शाळा / कॉलेज मध्ये शिकतो त्यातलं किती वापरतो?


शिक्षण हे अतिशय महत्त्वाचे आहे परंतु त्या बरोबर मुलांची (Value System Development ) गरजेची आहे. 


गेले १६ वर्ष मानव संसाधन क्षेत्रात काम करत असताना आलेले अनेक अनुभव हे शिकवून जातात कि मार्क्स पेक्षा तुमचा  सकारात्मक दृष्टिकोन आणि प्रामाणिक प्रयत्न याचा वाटा  तुमच्या शिक्षणाइतकाच महत्वाचा आहे. 


१५ वर्षापूर्वी नोकरी निमित्त पुण्यापासून ६०-६५ किमी रोज प्रवास करावा लागत होता, तो काळ माझ्या साठी शिकण्याचा काळ होता. पुरेशी बौद्धिक आणि आर्थिक परिस्थिती नसल्या मुळे पूर्ण वेळ शिक्षण घेणे शक्य नसल्यामुळे पार्ट टाईम MBA  केलं आणि  HR  मध्ये जाण्याचा मला गेट पास मिळाला!!


तिथेच आलेला अनुभव, माझ्या कंपनी मध्ये एक  ITI  Apprentice मुलगा होता, रोजचा ८०-८५ किमी प्रवास रेल्वेनी करून सकाळी ८.३० ला लोणावळा गाठायचा आणि त्या काळात त्याला असणारा पगार अतिशय कमी होता. परंतु काही गुण हे उपजत असतात.  Apprentice निमित्त त्याच्याशी नेहमी भेटी गाठी होत, परंतु कुठंही अंतराचे रडणं नाही कि, रेल्वे प्रवासाचा थकवा नाही. नेहमी हसतमुख आणि डोळ्यात नवीन काही करण्याची चमक.  Apprentice  पूर्ण झाल्यानंतर त्या मुलाला माझ्या वरिष्ठानी HR  मध्ये काम देण्याबद्दल विचारले, आणि तो हि तयार झाला, सुरुवातीला कंत्राटी कामगारांची हजेरी, त्याचे कागदपत्र आणि इतर काम शिकून पठ्या पुढच्या तयारीला लागला. अतिशय अल्पावधीत त्याने अनेक गोष्टी शिकल्या, ग्रामीण भागातील असल्यामुळे भाषेची असणारी पकड घट्ट होती , त्याचाच वापर करत लोकांशी संबंध सुधारत त्याने पुढचं पाऊल टाकलं पदवी मिळवली आणि हो रोजचा ८०-८५ किमी प्रवास सुरूच होता.

एवढ्यावर न थांबता त्याने व्यवस्थांपन विषयात पदविका हि केली आणि मजल दर मजल करत स्वतःचा सर्वांगीण विकास हि केला. तात्पर्य हेच कोणतेही विशिष्ट शिक्षण नसताना केवळ सकारात्मक दृष्टिकोन आणि योग्य प्रयन्त याच्या जोरावर तुम्ही यशस्वी होऊ शकता हे नक्कीच..


कोणतेही शिक्षण डिग्री किंवा डिप्लोमा या पुरत मर्यादित असते. त्या सर्टिफिकेट मुळे तुम्हाला केवळ कॉर्पोरेट किंवा नोकरी साठी प्रवेश मिळतो, म्हणूनच कि काय शिक्षण एक गेट पास!!!


चला तर मग असेच काही वैचारिक बदल घडवूया...

 

राहुल विठ्ठलराव भोईटे.


Tuesday, May 5, 2020

बंद म्हणजे काय ???

बंद म्हणजे काय ???

सोमवार सकाळ म्हणजे ऑफिसचा पहिला दिवस... नेहमीच्या धावपळीत ऑफिसला पोचलो न पोचलो तोच सौं चा फोन आला... शाळेतून फोन आला आहे मुलांना घरी घेऊन जा.. दुपारी बस येणार नाही सोडायला !!!
पहिला विचार डोक्यात आला सकाळी बस च्या मावशी काकांना सोसायटी मध्ये सोडा म्हणून केलेल्या दादागिरी मुळे तर अस झालं नाही ना!!!

मी नेहमीच उत्तर देत, बघतो सांगून शाळेत विचारलं तर बातमी खरी आहे कळलं...आता काय तर बायकोला शाळेत जावं लागणार हे नक्की.

पण हे सगळं का सुरु आहे हे उत्तर काही सापडेना... आपल्या नेहमीच्या आपुलकीच्या मित्रा कडे (गुगल) कडे चौकशी केली असता ...काही बातम्या बंद संदर्भात दिसल्या....

कामाच्या गडबडीत गुंतून गेल्याने लक्षात आले नाही कि आज बंद आहे...

घरी आल्या वर बायकोने सांगितलेला प्रसंग ऐकून मनात थोडी कालवाकालव झाली.

ती मुलांना शाळेत घ्यायला गेली असता माझा ६ वर्षाचा मुलगा वाट बघत बसला होता...नजर कावरीबावरी आणि कोणच्या तरी शोधात...कारण कोणीच दिसत न्हवतं.. ना बस चे ड्राइवर ना बस च्या मावशी... मागून आईची हाक ऐकून स्वारी खुशीत आली... आणि म्हणाली "मला वाटलं आज शाळेतच दुपारच्या शिफ्टला पण बसावं लागेल कारण आज बसच नाही.." शेजारी मित्र अर्णव जोशी मस्त बसला होता... दोघांचं डबा खाण्याचं काम सुरु होत...

पण डब्यात कोबीची न आवडणारी भाजी असल्या मूळ स्वारी थोडी नाखूष होती...पण अर्णव डबा खात होता..
बायकोने विचारलं का रे डबा नाही खात... उत्तर आलं अर्णवला भूक लागली म्हणून त्याला दिला डबा...

मित्रानो एवढं सांगण्याचं कारण हेच... या बाल मनाला जिथे जात पात, धर्म कळत नाही त्यांना आपण बंद पाळून काय देतोय..

जातपात, आरक्षण, आत्महत्या, बंद या आणि अनेक गोष्टींचे पुढील पिढीवर होणारे परिणाम लक्षात घेऊन या मध्ये अडकून राहण्या पेक्षा त्यांना एक माणूस म्हणून जगायला शिकवलं पाहिजे...

एक गोष्ट नक्की एक चांगला माणूस म्हणून राहण्या साठी कोणालाच कोणताही आरक्षण लागणार नाही... आणि बंद हि करावे लागणार नाहीत...

म्हणूनच वाटत बंदच बंद करा !!!!!!

चाळीशीच्या उंबरठ्यावर...

चाळीशीच्या उंबरठ्यावर...

आज १३ जुलै माझा वाढदिवस..

सातारा जिल्ह्यातील कवठे गावात जन्म झाला परंतु पूर्ण आयुष्य या पुण्यनगरी मध्ये गेले असल्या मुळे थोडी चौकस बुद्धी आहे असं वाटत... त्याच दृष्टिकोनातून मागील ४० वर्षात आलेल्या काही चांगल्या, वाईट आठवणींची उजळणी करण्याचा आजचा दिवस...

अर्थात या दिवशी माझ्या आई अण्णांना विसरून कस चालेल...

"यशाच्या आकाशात गरुड होऊन जेव्हा भरारी मारत असशील तेव्हा पृथ्वीवर दोन आतूर डोळे जग विसरून पहात असतील त्या माझ्या गरुडास..".

अभिनव मध्ये असतानां शाळेत कलर ड्रेस घालून मित्रांना रावळगाव चॉकलेट देण्याची मजा काही औरच... पण तेच सगळे चॉकलेट मित्र आज जेव्हा फोन करून शुभेच्छा देतात तेव्हा ती मैत्री नेहमीच आपुलकीची होते..
बघता बघता शाळा संपून कॉलेजच्या कट्टया वर साजरे केलेले वाढदिवस,लो बजेट मधल्या पार्ट्या ( आता लगेच पार्टी मागू नका...) या सारख्या आठवणी नेहमीच तजेला देतात..

सर्व वाय. एम. आणि मॉडर्न कट्टा मित्र मंडळी पुन्हा एकदा धन्यवाद...

मूळचा पिंड माणसं जोडण्याचा असल्या मुळे प्रोफेशनल वाटचालीत अनेक मित्र भेटले आणि त्यांच्या कडून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या... पुढेही अशीच सोबत राहो...

लास्ट बट नॉट द लिस्ट माझी गोड फॅमिली मनिषा तन्मय आणि वेदांत... ज्यांनी माझ्या आयुष्याच्या चढ उतारात तब्बल एक तप माझी साथ दिली...

चाळीशीच्या उंबरठ्या वर मागे वळून पाहताना नक्कीच आनंद होतोय...मस्त चाललंय आमचं...


सर्वांच्या शुभेच्छा अशाच राहो दे...

सर्वांचे आभार...

टीप - (सदर लेख २०१८ मधील आहे) 

कोथरुड ते शिवणे व्हाया गादिया इस्टेट..

कोथरूड ते शिवणे व्हाया नंदनवन  सोसायटी.. (गादिया इस्टेट )

कोथरूड एक सुंदर आणि सुसंस्कृत  मराठमोळं ठिकाण.शालेय दिवसांपासून अगदी पूर्वीच्या बालगटापासून ते वयाची जवळपास चाळीशी गाठेपर्यंत अनेक चांगल्या वाईट आठवणींचा ठेवा घेत नवीन आयुष्याची वाटचाल शिवणेकडे करत आहे.

अभिनव शाळेतील माझे जुने
बालमित्र  उमेश जावळकर, सचिन  नाणेकर, शिवाजी उभे
महाराज,संभाजी चौधरी,हितेश जैन,अभ्या घुमरे, टम्म्या  आणि इतर  सगळे अजूनही  तेच जुने मैत्रीचे बंध जपणारे माझे मित्र नेहमीच सोबत होते आणि असतील.जावळकरांच्या अंगणात प्लास्टिक बॉल, प्लायवुड ने खेळलेली क्रिकेट असेल किंवा जीत ग्राउंडवर खेळलेल्या विशाल भेलके,नवनाथ टीम बरोबरच्या म्याचेस आणि गादिया टीमने हरलेल्या कटू आठवणी, वाय.म.कॉलेजचे ते मजेदार दिवस आणि हेवनचा चहा... त्याची  मजा काही औरच.

१९९३ जेव्हा नंदनवन सोसायटी (मूळची गादिया इस्टेट)मध्ये शिफ्ट झाल्यावर भेटलेले नवे मित्र निलेश थरकुडे, सचिन आढाव, योगेश दळवी(बाळा), राहुल कुंभार, प्रशांत आवटे (बंटी), गणेश कोळसे (गण्या), सचिन नेवसे आणि इतर सर्वजण कायम स्मरणात राहतील.गार्डन कोर्ट ग्रॉऊंड वर सौदामिनी,आर. म.टीम ला सतत हरवणे आणि परत हरवण्यासाठी निमंत्रण देणं.अभिजित शिंदे आणि सचिन
 बोराडे, विनायक कडूच्या संयुक्त भुसारी आणि भारतीनगर मित्रांशी होणाऱ्या लुटुपुटुच्या स्पर्धा,निवास, वर्पे बंधू,विनायक येनपुरे,विशाल आणि मित्राबरोबरच रात्री व्हॉलीबॉल खेळणं आणि त्यातून जोडली गेलेली मैत्रीची नाती नेहमीच मनाला ताजतवानं करतात.

संजू पवार, बंटी ,बाळा,निलेश आणि गादिया मधल्या मित्रांचा सिंहगड ट्रेक असेल किंवा दिवाळीच्या धुक्यात केलेली प्रामाणिक क्रिकेट प्रॅक्टिस,१९९९ च्या वर्ल्ड कप नंतर केलेल्या चर्चा,अनंता लोणकरांची वेगवान डावखुरी गोलंदाजी, सचिन  आढाव यांचा थरकुडेनी घेतलेला इंटरव्हिव,नेवसे काका,भालेकर काकूंची,आमले आजींची नेहमी असणारी आपुलकीची चौकशी,यातून आयुष्यात अनेक अडचणीना समोरजाण्याचं बळ दिलं हे मात्र नक्कीच.आई वडिलांच्या निधनानंतर केलेल्या अनेक तडजोडी आणि सर्वांची मिळालेली साथ अशीच पुढंही राहो.

मनिषा बरोबर विवाहबद्ध झाल्यानंतरआलेल्या कौटुंबिक जवाबदाऱ्या सांभाळताना आलेल्या आठवणी हि याच कोथरूडच्याच ....

दुर्गा (मंगेशची कॉफी )असेल कि राजपूतचा सामोसा, हर्षदची अस्सल  मराठी पदार्थांची मेजवानी, हित्याच्या ४९/९९ मधल्या चहाच्या मेहफिलची  सर  येणार नाही.. व्यावसायिक वाटचालीमध्ये २००८ मध्ये कोथरूड ची नाळ तुटली आणि नशिबाने पुन्हा जुळाली.

आयुष्यातील एक सुखद टप्पा जवळपास ३८ वर्ष याच नंदनवनात गेला.अनेक आठवणी मनात साठवून आणि जोपासत  कोथरूडचा मुक्काम शिवणेला हलवत आहे...

या निमित्ताने  काही  जुन्या  आठवणींना उजाळा..आणि माझ्या सर्व मित्रांनाशुभेच्छा...

वर्क लाईफ बॅलन्स काळाची गरज ?

जागतिक महासत्ता बनण्यासाठी जर चीनशी स्पर्धा करायची असेल तर कॉस्ट आणि क्वालिटी यावर करावी लागेल. आपली मानसिकता थोडी बदलावी लागेल. ते कितपत शक...