जागतिक महासत्ता बनण्यासाठी जर चीनशी स्पर्धा करायची असेल तर कॉस्ट आणि क्वालिटी यावर करावी लागेल. आपली मानसिकता थोडी बदलावी लागेल. ते कितपत शक्य आहे हा मोठा प्रश्न आहेच परंतु, चीन नेहमीच लो कॉस्ट प्रॉडक्ट्स तयार करते, मुळात त्यात मोठा वाटा मनुष्यबळाचा आहे. सरासरी १२ तास काम करणे हा अतिशय कॉमन प्रकार आहे तिकडे. त्या विरुद्ध आपल्याकडे ८ ते ८.३० तास काम, आणि हे ८ तास अतिशय योग्य आहेत परंतु त्यात सोशल मीडिया, व्हाट्सअँप आणि घर संसार करत काम सुरु असते. त्या बद्दल विचार केला तर बरेचदा कामगार आणि वरिष्ठ अधिकारी यामध्ये असणारी पगाराची दरी आणि असणारा कामाचा व्याप या गोष्टी समोर येतात.. त्यामुळे कामगारांची असणारी प्रॉडक्टिव्हिटी आणि त्याला साथ देणारी कर्मचाऱ्यांचा परफॉर्मन्स यात फार तफावत आहे...
पगार एक विषय सोडला तरी खरंच आपल्याकडील वरिष्ठ अधिकारी किंवा कर्मचारी आपल्या वेळेचा योग्य विनियोग करतात का हा मोठा विषय आहे? कोविड पुर्वी असणारी कार्यपद्धती आणि कोविड नंतर असणारी कार्यपद्धती यात बराच बदल झाला आहे. कोविड काळात लोक संपर्कात नसल्यामुळे सुरु झालेले व्हाट्सअँप ग्रुप आता कोविड जाऊन ४ वर्ष झाली तरी बंद होण्याचे नाव घेत नाहीत. बरेचदा प्रश्न पडतो व्हाट्सअँप आधी काम चालू होते कि नव्हते?? बरेच कॉर्पोरेट लीडर आपला ५० टक्के वेळ मीटिंग मध्ये घालवतात.
आता लगेच पाहिजे हा एक नवीन ट्रेंड सुरु झाला आणि त्या मुळे माणूस आपलं माणूसपण हरवून गेला कि काय असे वाटते. कोणत्याही गोष्टीसाठी ठराविक अशी कालमर्यादा असते आणि मग त्या वेळेत ती गोष्ट पूर्ण होते, परंतु कालानुरूप आपण हे विसरलो आहोत आणि त्यामुळे चुटकी सरशी सगळे हवे हि मानसिकता सगळीकडे झाली आहे, मग पिझ्झा डिलिव्हरी असो कि आपण विसरून गेलेली एखादी गोष्ट.. थांबणे, थोडा विचार करून गोष्ट करणे या गोष्टी आता कॉर्पोरेट मध्ये लो लीडरशिप म्हणून पहिल्या जातात. तुम्ही जेवढे अग्ग्रेसिव्ह तेवढे छान लीडर असा एक समज रूढ झाला असल्यामुळे फक्त आरडाओरडा करा आणि काम करून घ्या, या मानसिकतेचा प्रभाव सर्वसाधारणपाने दिसतो.. मग यामध्ये ती स्वतः व्यक्तीसुद्धा होरपळत असते याच भान त्यांना राहत नाही.. कारण समोर दिसणारी लाखो रुपयाची पॅकेज आणि मोठ्या पदाच्या प्रलोभनांमुळे आपण स्वतःला हरवत चाललो आहोत हे फार उशिरा कळते.
काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीला भेटलो, जॉब कसा, मार्केट काय म्हणतंय याची चर्चा सुरु झाली.. सदर व्यक्ती २० वर्ष कॉर्पोरेट मध्ये काम करत असून अनेक मल्टि नॅशनल कंपन्यांमध्ये त्याने काम केले आहे, परंतु ४० शिमधील या तरुणाची नोकरी करण्याची उमेद थोडी कमी झाली कारण असणारे कॉर्पोरेट मधील राजकारण आणि सततचा ताण.. त्याने सांगितल्या प्रमाणे दिवसाचे २००० ते २५०० व्हाट्सअँप मेसेज आणि किमान १०० ते २५० फोन कॉल यामधून सुटका महत्वाची आहे असे त्याचे मत आहे.
भारतासारख्या सुजलाम सुफलाम आणि सर्व सुविधांनी, उत्तम शिक्षित मनुष्यबळ असणाऱ्या सुस्सज अशा देशात कॉर्पोरेट राजकारण, आपल्या देशाचे राजकारण, जातपात, धर्म या पेक्षा उत्तम अशा वर्क लाइफ बॅलन्स आणि तणावमुक्त वातावरणासाठी योग्य नियमांची गरज जास्त आहे परंतु नुसत्या कागदोपत्री पॉलिसी नकोत, तर योग्य ठोस नियमावली आणि सर्वसमावेशक धोरण हवे, तेव्हा आपण खऱ्या अर्थाने जगात पुढे जाऊ.. अन्यथा कितीही मोठी कॉलेज आणि कितीही मोठ्या डिग्री झाल्या तरीही आपलं प्रोडक्शन व्हाट्सअँप वरूनच निघणार यात शंका नाही..
राहुल भोईटे
औद्योगिक आणि संस्थात्मक मानसशास्त्रज्ञ